निर्भय काळोख

कोपर्डी, अहमदनगर इथं झालेल्या अल्पवयीन तरुणीच्या बलात्काराच्या घटनेने महाराष्ट्राच्या सामाजिक प्रतलावर अनेक पडसाद उमटले. खऱ्या-खोट्या बातम्या आणि अफवांच्या पडद्याआड, मुक्त पत्रकार जयंतकुमार सोनवणे व मानस पगार यांचा थेट कोपर्डीहून रिपोर्ट.
Credit : जयंतकुमार सोनवणे

खर्डा, जवखेडा, सोनई या निर्घृण हत्याकांडांनंतर अहमदनगर जिल्ह्यातील माणुसकीला काळिमा फासणारी घटना दि. १३ जुलै रोजी कोपर्डी (ता. कर्जत) या गावी घडली. समाजजीवनात अन्याय-अत्याचार झाला की पारंपारिक शोषक मानल्या गेलेल्या समाजघटकाच्या दिशेने संशयाची सुई जाते. बाहेरून शांत वाटणारा गावगाड्याचा डोलारा आपल्या आतील जखम मोकळी करू लागतो. शोषक आणि शोषित या दोन्ही घटकांचे पंचक्रोशीतील व्यवहार विचलित होतात. शहरातील सत्यशोधक, पत्रकार, बुद्धीजीवी, सामाजिक कार्यकर्ते आपापल्या बौध्दिक कक्षांच्या मर्यादेनुसार आणि आपापल्या प्राथमिकतेनुसार घटनेचे विश्लेषण करून टिपणं देण्यात मग्न असतात. यातल्या अनेकांची प्रतिमा पुढे बळकट होते; पण याहीपलीकडे विस्थापित घटकांच्या सामाजिक पुनर्वसनाची शाश्वत उत्तरे यांपैकी कोणाकडेही नसतात.

kopardi 1

(छायाचित्र: जयंतकुमार सोनवणे) 

महाराष्ट्राच्या राजकीय आणि कृषी क्षेत्रात अग्रणी असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत आणि जामखेड हे कायमस्वरूपी दुष्काळी तालुके आहेत. कॅनल द्वारे निव्वळ ३१ % सिंचन क्षेत्र लाभलेल्या कर्जत तालुक्यातील कोपर्डी २०२२ लोकसंख्येचे गाव ४ वस्त्यांचे मिळून बनले आहे. शेतजमीन बरड आहे. शेतीसोबत पशुपालन हा एकमेव जोडधंदा गावात चालतो. गावातील दलित समाज अल्पभूधारक आहे आणि शेतमजुरी करून गुजराण करत आहे. सकाळी ८ ते संध्याकाळी ८.३० वाजेदरम्यान गावात एस.टी. बसची एकही फेरी होत नाही. गावात जिल्हा परिषदेची मराठी शाळा असून माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक शिक्षणासाठी विद्यार्थी गावापासून ५ किमी दूर असलेल्या कुळधरण येथे जातात. दि. १३ जुलै रोजी संध्याकाळी ६.३० वाजता पंधरा वर्षीय युवतीवर चार नराधमांनी पाळत ठेवून बलात्कार केला. दरम्यान प्रतिकार करण्यात अपयशी ठरलेल्या पिडीत युवतीची गळा दाबून हत्या करण्यात आली. पुरावे नष्ट करण्यासाठी पिडीतेच्या गुप्तांगात माती ठासण्यात आली, तोंडात तीन हातरुमाल कोंबण्यात आले. मृत्यूनंतरही तिच्या निर्जीव शरीराची विडंबना करण्यात आली. दोन्ही हात आणि मान पिरगळून धडावेगळे करण्याचा प्रयत्न झाला. डोक्याचे केस निर्दयीपणे उपटण्यात आले. शरीरावर अनेक ठिकाणी दातांनी लचके तोडण्यात आले. गुप्तांगावर तीक्ष्ण जखमा करण्यात आल्या.

पिडीत विद्यार्थिनी एक उत्कृष्ट खो-खो पटू होती. गैरकृत्य होत असताना ती स्वतःची सुटका करून घेण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती. बलात्काराच्या घटनास्थळी सुमारे अर्धा फुटाचा खड्डा आढळून आला आहे. बलात्कार झाला त्या जागेपासून ५० फुट पूर्वेला काटेरी झुडुपांत पिडीतेचे वस्त्र मिळाले; अंदाजे १०० मीटर पश्चिमेला बाजरीच्या शेतात कडुलिंबाच्या झाडाखाली मृतदेह आढळून आला. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू शिंदे मृतदेह शेतालगतच्या विहिरीकडे मृतदेह नेत असताना संध्याकाळी ७.३० वाजता गुन्हा उघडकीस आला. पिडीत युवतीच्या आईच्या सांगण्यावरून मावसभाऊ तिच्या शोधात निघाला. रस्त्यालगतच्या शेतात त्याला पिडीतेची सायकल आढळली. आजूबाजूला शोधाशोध केली असता शेजारील शेतात त्याला आरोपी जितेंद्र शिंदे दिसला. त्याच्या दिशेने जात असतानाच आरोपीने पळ काढला. आरोपी दिसला त्या जागी पिडीत युवतीचे प्रेत विद्रूप अवस्थेत आढळले. तात्काळ तिला कुळधरण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले. त्यानंतर पोलीस प्रशासनाने कायदेशीर सोपस्कार पार पाडले.

हा घटनाक्रम उलगडत असताना अनेक गोष्टी समोर आल्या. आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू शिंदे, नितीन भैलुमे आणि विजय शिंदे हे एकमेकांचे मावस भाऊ आहेत. संतोष भवाळ हा त्यांचा मित्र होता. या सर्वांचे कुटुंबीय गावात शेतमजुरी करतात. जितेंद्र शिंदे गावाजवळील एका वीटभट्टीवर मजुरी करत होता. नुकतीच त्याने नवी मोटारसायकल घेतली, यानिमित्ताने या सर्वांनी घटनेच्या दिवशी मद्यप्राशन केले. आरोपी संतोष भवाळ याची पिडीतेवर नजर होती असे काही गावकऱ्यांनी सांगितले. शेतजमिनीची प्रत आणि अत्यल्प पर्जन्यमान पाहता गावातील शेतीचे उत्पन्न सुद्धा अत्यल्प आहे. गावातील शेतकऱ्यांची सांपत्तिक स्थिती जेमतेमच आहे. अशा परिस्थितीत गावातील सर्व जातीय सामंजस्य होते. गावात आजपर्यंत एकही अॅट्रोसिटीची घटना घडलेली नाही हे याचे प्रातिनिधिक उदाहरण. या घटनेनंतर मात्र गावाच्या सामाजिक वातावरणात मात्र तणाव जाणवत आहे.

kopardi2

(गुन्हा घडला ते ठिकाण. छायाचित्र: जयंतकुमार सोनवणे) 

१३ जुलैला रात्री उत्तरीय तपासणीसाठी पिडीतेचा मृतदेह कर्जत येथे आणला गेल्यावर गावकऱ्यांनी सर्व आरोपींना अटक झाल्याशिवाय उत्तरीय तपासणी न करण्याची भूमिका घेतली. पोलीस प्रशासनाने मोबाईल क्रमांकच्या लोकेशनचा मागोवा घेत श्रीगोंदा येथून आरोपी जितेंद्र शिंदेला अटक केली. मात्र एक आरोपीला अटक केल्यानंतर पोलिसांनी इतर आरोपींना अटक करण्यासाठी आडमुठेपणाची भूमिका घेतल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. कर्जत तालुका हा राज्याचे तत्कालीन गृहराज्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांचा मतदारसंघ आहे. दि.१४ रोजी दुपारी १ वाजून १० मिनिटांनी कर्जत पोलीस स्टेशनला पिडीत युवतीच्या मावसभावाच्या फिर्यादीवरून भा.दं.वि. कलम ३०२, ३७६ (अ) नुसार गुन्ह्याची नोंदणी करण्यात आली आणि त्यानंतर पिडीतेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात प्रा. राम शिंदे यांना जलसंधारण मंत्रीपदी पदोन्नती मिळाली. दि. १४ जुलै रोजी प्रा. शिंदेनी गृहराज्यमंत्री पदावरून पदमुक्त होत मंत्रालयात नव्या खात्याचा पदभार स्विकारला.

दि. १५ रोजी दुसऱ्या आरोपीला अटक झाली. दि. १६ रोजी घटनेला ४८ तास उलटून गेल्यानंतरही उर्वरित दोन आरोपींना अटक झाली नव्हती, म्हणून शिवप्रहार या सामाजिक संघटनेने याविरोधात कर्जत येथे आंदोलन केले. यादरम्यान प्रा. राम शिंदे यांनी पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेत मदतीचे आश्वासन दिले. दि. १६ रोजी दुपारी पोलिसांनी तिसऱ्या आरोपीला गजाआड केले; चौथा आरोपी विजय शिंदे अजूनही मोकाट आहे. घटना घडल्यानंतर दोन दिवसांनी १५ जुलै रोजी स्थानिक वर्तमानपत्राने सदर घटनेला प्रसिद्धी दिली. ह्याच बातम्यांची कात्रणे सोशल मिडीयावरून पसरले आणि महाराष्ट्राला कोपर्डीची निर्भया समजली. तोवर राज्यस्तरावरील एकाही प्रसारमाध्यमाने सदर घटनेला प्रसिद्धी दिली नाही. अपवाद म्हणून एका वृत्तवाहिनीने पट्टी दाखवून आपली जबाबदारी पार पाडली. यापूर्वीच्या हत्याकांड प्रकरणातील प्रसारमाध्यमांची भूमिका आणि सदर घटनेबद्दलची प्राथमिकता यांतील तफावत यावर सोशल मिडीया टीका होऊ लागली; यानंतर मात्र प्रसारमाध्यमांनी या घटनेला प्रसिद्धी दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात येताच नाशिकच्या विभागीय न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या तज्ञांनी घटनास्थळी येवून तपासणी केली. उद्या न्यायालयात खटला उभा राहिला तर प्रत्यक्षदर्शी, फिर्यादी, उत्तरीय तपासणी करणारे वैद्यकीय अधिकारी, पोलीस तपास अधिकारी यांच्या जबाबासोबतच आरोपींचा वैद्यकीय अहवाल आणि न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल महत्वाचा ठरणार आहे. परंतु उत्तरीय तपासणी (Post Mortem)च्या आधीच न्यायवैद्यक (Forensic) चाचणी झाली असती तर अधिक सबळ पुरावे मिळून सर्वच आरोपींवर आरोप निश्चिती सोपी झाली असती असे अनेक विधिज्ञांचे मत आहे. घटनेचे गांभीर्य ओळखता प्रथम कर्जत वकील संघटनेने त्यासोबत लगोलग अहमदनगर जिल्हा वकील संघटनेने आरोपींचे वकीलपत्र न स्वीकारण्याचा ठराव केला आहे.

kopardi

(जिल्ह्याचे माजी पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांना छेडले असता, “हे आमचे सर्वांचे अपयश आहे” हे त्यांनी मान्य केले. छायाचित्र: जयंतकुमार सोनवणे) 

 

अहमदनगर जिल्हा राजकीयदृष्ट्या प्रगत जिल्हा मानला जातो. पोलीस कारवाईला दिरंगाई होत असताना कोणताही सत्ताधारी आणि विरोधक पक्ष पोलिसांवर नैतिक दबाव आणू शकला नाही याचा गावकऱ्यांसोबतच सर्वांना खेद वाटत आहे. याबाबत जिल्ह्याचे माजी पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांना छेडले असता, “हे आमचे सर्वांचे अपयश आहे” हे त्यांनी मान्य केले. पिडीत युवती कोपर्डीपासून ५ किमी दूर असलेल्या कुळधरण येथील नूतन माध्यमिक विद्यालयात इयत्ता नववीत शिकत होती. गेल्या आठवडाभरापासून ही शाळा बंद आहे. आजूबाजूच्या पिंपळवाडी, राक्षसवाडी, दालवडी, सुपेकरवाडी, नाथाची वाडी या गावांतील विद्यार्थी पायरीट करत कुळधरण येथील शाळेत शिकायला येतात. संपूर्ण पंचक्रोशीत या घटनेमुळे भीतीचे वातावरण आहे. कोपर्डीपासून कुळधरणकडे जाणारा रस्ता रेहकुरी पक्षी अभयारण्यातून जातो. आता या घटनेमुळे पालक निर्जन रस्त्यावरून मुलांना शाळेत पाठवायला धजत नाहीयेत. कर्जत तालुक्यात सध्या ६० पोलीस कर्मचारी सेवारत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून कुळधरण येथे पोलीस आउटपोस्ट मिळावे यासाठी पाठपुरावा सुरु आहे. गृहराज्यमंत्री असताना काही दिवसांपूर्वी प्रा. राम शिंदेंनी “गुन्हे वाढल्याशिवाय नवीन पोलीस स्टेशन निर्माण करता येणार नाही” असे वक्तव्य केले होते. वरील परिस्थिती पाहता कुळधरण येथे पोलीस आउटपोस्ट मिळेल ही आस बाळगण्यास तूर्तास काही तरी गैर नाही.

राहता राहिला प्रश्न समाजाचा... पिडीत युवती आणि आरोपी यांची जात बघून सामाजिक न्यायाचा दैदिप्यमान वारसा लाभलेल्या महाराष्ट्राचे सामाजिक वातावरण ढवळून निघत आहे. पण बलात्कार पीडितांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे सामाजिक स्थान बळकट करण्यासाठी आपण कोणती व्यवस्था निर्माण केली आहे याचे आत्मपरीक्षण केल्यास हातात फुले-शाहू आणि आंबेडकरांच्या कार्याचे थडगेच सापडतात. शाळेतील शिपायाकडून लैंगिक अत्याचाराची शिकार झालेल्या पुण्यातील एका चिमुरडीला एकाही शाळेत प्रवेश मिळत नाहीये. कोपर्डीच्या पिडीत युवतीचे आर्थिक दैन्यावस्थेमुळे अवघ्या १५ वर्षी येत्या काही महिन्यात लग्न होणार होते. दिल्लीच्या ‘निर्भया’ घटनेनंतर या देशात स्त्री सन्मानाची 'लाट' तयार झाली होती. कोपर्डीच्या घटनेबाबत ही लाट शमली आहे की काय असे वाटावे इतकी शांत आहे. आपल्या प्रवृत्तीत बदल न करता या सर्व पीडितांना ‘निर्भया’ म्हणणाऱ्या बंडखोर समाजाला त्याचा बौद्धिक काळोख लखलाभ! 

(सर्व माहिती व छायाचित्र अधिकार लेखाकाधीन.)